Videocon Rise and Fall : नव्वदच्या दशकातील तो काळ आठवा, जेव्हा छतावर अँटेना आणि घरात रंगीत टीव्ही येणे म्हणजे संपूर्ण गल्लीसाठी एक सोहळा असायचा. त्या काळात ज्यांच्या घरात 'व्हिडिओकॉन'चा टीव्ही किंवा वॉशिंग मशीन दिसायची, ते कुटुंब प्रगतीपथावर आहे असे मानले जायचे. छत्रपती संभाजीनगरच्या एका छोट्या गावातून सुरू झालेली ही कंपनी केवळ एक ब्रँड नव्हती, तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान होती. पण, यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या या कंपनीचा प्रवास आज एका करुण वळणावर येऊन थांबला आहे.
कलर टीव्हीची क्रांती आणि धूत यांचे 'व्हिजन'व्हिडिओकॉनची पायाभरणी १९७९ मध्ये वेणुगोपाल धूत यांनी केली. धूत कुटुंबाचा मूळ व्यवसाय शेतीशी निगडित होता, पण वेणुगोपाल यांना बदलाची चाहूल लागली होती. भारतात ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना असताना त्यांनी 'रंगीत' भविष्याचा अंदाज घेतला. जपानच्या 'तोशिबा' कंपनीशी हातमिळवणी करून त्यांनी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान भारतीय खिशाला परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिले. 'ब्रिंग होम द मॅजिक' या जाहिरातीने घराघरात गारुड केले आणि व्हिडिओकॉन भारताची सर्वात मोठी कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी बनली.
यशाची शिखरे आणि विस्ताराची हावटीव्हीनंतर फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसीमध्येही व्हिडिओकॉनने दबदबा निर्माण केला. ९० च्या दशकात व्हिडिओकॉन म्हणजे विश्वासाचे दुसरे नाव होते. वेणुगोपाल धूत यांनी परदेशी कंपन्यांनाही विकत घेण्यास सुरुवात केली. दक्षिण कोरियाच्या 'डेवू' कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायावर त्यांनी दावा ठोकला आणि जागतिक बाजारपेठेत आपली मोहोर उमटवली.
कुठे चुकलं? 'ओव्हर-डायव्हर्सिफिकेशन'चा फासव्हिडिओकॉनच्या पतनाला एकच गोष्ट कारणीभूत ठरली, ती म्हणजे गरजेपेक्षा जास्त विस्तार. इलेक्ट्रॉनिक्समध्ये यशस्वी झाल्यानंतर धूत यांनी एकाच वेळी अनेक क्षेत्रात उडी मारली. तेल, वायू, वीज आणि सर्वात धोकादायक असलेल्या 'टेलिकॉम' क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. टेलिकॉम परवाने मिळवण्यासाठी कंपनीने बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले. टेलिकॉममध्ये पैसे पाण्यासारखे वाहत असताना, घरगुती बाजारपेठेत सॅमसंग आणि एलजीसारख्या कंपन्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि स्लिम डिझाइनसह शिरकाव केला. व्हिडिओकॉनचे लक्ष टेलिकॉम आणि कर्जाकडे असल्याने त्यांचे मुख्य उत्पादन (इलेक्ट्रॉनिक्स) कालबाह्य झाले.
२जी घोटाळा आणि चंदा कोचर प्रकरण२०१२ मध्ये सुप्रीम कोर्टाने २जी घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान व्हिडिओकॉनचे अनेक टेलिकॉम लायसन्स रद्द केले. यात कंपनीचे हजारो कोटी एका झटक्यात बुडाले. त्यानंतर, आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन सीईओ चंदा कोचर यांच्याशी संबंधित कर्ज प्रकरणातील कथित गैरव्यवहाराने कंपनीच्या प्रतिमेला शेवटचा तडा दिला. ज्या संभाजीनगरच्या फॅक्टरीमुळे हजारो घरे चालत होती, तिथे शांतता पसरली.
वाचा - १० वर्षे राहिल्यास घर भाडेकरूचे होते? काय सांगतो कायदा? पाहा 'मालकी हक्का'बाबतचा नेमका नियम
आजची स्थिती : डिश टीव्हीशी विलीनीकरण आणि वेदांताचा ताबा२०१८ मध्ये व्हिडिओकॉन समूह तब्बल ९०,००० कोटी रुपयांच्या कर्जापोटी दिवाळखोरी प्रक्रियेत गेला. व्हिडिओकॉन d2h या कंपनीचे डिश टीव्हीमध्ये विलीनीकरण झाले आहे. आजही d2h ब्रँड वापरला जातो, पण त्याचे नियंत्रण पूर्णपणे डिश टीव्ही इंडियाकडे आहे. २०२१ मध्ये व्हिडिओकॉनचा मुख्य व्यवसाय 'वेदांता' समूहाने ताब्यात घेतला. वेणुगोपाल धूत आणि त्यांच्या कुटुंबाचा आता या समूहावर कोणताही मालकी हक्क राहिलेला नाही.
Web Summary : Videocon, once a household name, fell due to over-diversification into telecom and other sectors. Loans for telecom licenses, coupled with competition and the 2G scam, led to its bankruptcy. Vedanta Group now owns the core business.
Web Summary : वीडियोकॉन, जो कभी एक घरेलू नाम था, दूरसंचार और अन्य क्षेत्रों में अत्यधिक विविधीकरण के कारण गिर गया। दूरसंचार लाइसेंस के लिए ऋण, प्रतिस्पर्धा और 2जी घोटाले के कारण यह दिवालिया हो गया। अब वेदांता समूह के पास मुख्य व्यवसाय है।